भुसावळ : प्रतिनिधी
विजेच्या खांबावर अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्नात दहा वर्षीय मुलाला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भुसावळ तालुक्यातील वराडसीम शिवारात २३ जानेवारी रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन बिसन बारेला (वय १०) असे मृत मुलाचे नाव आहे. २३ जानेवारी रोजी नितीन वराडसीम शिवारात पतंग उडवत असताना त्याची पतंग विजेच्या खांबावर अडकली. ती काढण्यासाठी तो खांबावर चढत असताना विद्युत तारांचा त्याला जोरदार धक्का बसला. या अपघातात नितीन गंभीररीत्या भाजला गेला.
घटनेनंतर नितीनला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र उपचार सुरू असतानाच २९ जानेवारी रोजी नितीनची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बारेला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



