Home » राष्ट्रीय » प्राजक्ता माळीची खास पोस्ट; अंकुश चौधरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्राजक्ता माळीची खास पोस्ट; अंकुश चौधरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : वृत्तसंस्था

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अंकुश चौधरी यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही खास पोस्ट शेअर करत अंकुशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी सध्या त्यांच्या नवीन वेबसिरीज ‘देवखेळ’मुळे चर्चेत आहेत. ही वेबसिरीज नुकतीच झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच सिरीजच्या सेटवरील काही खास क्षणांचे फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर करत अंकुशसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘देवखेळ’ या वेबसिरीजमधून अंकुश चौधरीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. “पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार!” ही लक्षवेधी टॅगलाईन असलेल्या या मालिकेत प्राजक्ताने ‘सारिका निमकर’ तर अंकुशने ‘विश्वास सरंजामे’ ही भूमिका साकारली आहे. अंकुश चौधरी यांनी ३१ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांचा आणि अभिनेत्री दीपा परब-चौधरी यांचा लग्नाचा १८ वा वाढदिवसही आहे. या दुहेरी आनंदाच्या निमित्ताने दीपा परब-चौधरी यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

“लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. म्हणूनच वरच्याने मांडलेला हा १८ वर्षांचा सुंदर ‘देवखेळ’ सदैव असाच बहरत राहू देत. वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!” असे कॅप्शन दीपाने आपल्या पोस्टला दिले आहे. ‘देवखेळ’च्या यशासोबतच अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनीही सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, सध्या मनोरंजन विश्वात अंकुश आणि ‘देवखेळ’चीच चर्चा रंगली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *