Home » राष्ट्रीय » इस्लामाबादमध्ये भीषण आत्मघाती स्फोटात 31 जणांचा बळी !

इस्लामाबादमध्ये भीषण आत्मघाती स्फोटात 31 जणांचा बळी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे शुक्रवारच्या नमाजदरम्यान शिया मशिदीत झालेल्या भीषण आत्मघाती स्फोटात किमान 31 जणांचा मृत्यू झाला असून 169 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने ही माहिती दिली आहे. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले असून सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

इस्लामाबादचे पोलीस प्रमुख यांनी संपूर्ण शहरात आणीबाणी जाहीर केली असून सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. स्फोटामागील दहशतवादी संघटनांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी मोहीम सुरू केली आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. निष्पाप नागरिकांवर हल्ला करणे मानवतेच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

पाकिस्तान सरकारचे मंत्री डॉ. तारिक फजल चौधरी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “इस्लामाबादमधील स्फोटाचा मी तीव्र निषेध करतो. जीवितहानीमुळे मन हेलावून गेले आहे. अशा दहशतवादी घटना देशाचे मनोबल खचवू शकत नाहीत. शांतता, सहिष्णुता आणि स्थैर्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी 11 नोव्हेंबर 2025 रोजी इस्लामाबादमधील G-11 परिसरात जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 30 हून अधिक जण जखमी झाले होते.

दरम्यान, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 नुसार पाकिस्तान हा बुर्किना फासोनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरला आहे. अहवालानुसार तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या हल्ल्यांमध्ये 90 टक्के वाढ झाली असून बलोच लिबरेशन आर्मी (BLA) च्या हल्ल्यांत 60 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. इस्लामिक स्टेट-खोरासान (IS-K) देखील आता पाकिस्तानी शहरांना लक्ष्य करत असल्याचे समोर आले आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे पाकिस्तानमधील सर्वाधिक दहशतवादग्रस्त भाग असून देशातील सुमारे 90 टक्के दहशतवादी घटना याच भागात घडत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *