Home » जळगाव » अमळनेर » असहायतेचा फायदा घेत २४ वर्षीय महिलेवर अत्याचार !

असहायतेचा फायदा घेत २४ वर्षीय महिलेवर अत्याचार !

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत एका शिवारात एका २४ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला मध्य प्रदेशातील असून, तिला आमिष दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेत एका नराधमाने अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी अॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला (वय २४ वर्षे) ही मूळची मध्य प्रदेशातील रहिवासी असून ती सध्या भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एका झोपडीत ती एकटी असताना, संशयित आरोपी आकीबखान गफ्फारखान (रा. अमळनेर) याने तिला गाठले. पीडित महिला ही तिथे एकटीच आहे, याची माहिती असतानाही आरोपीने तिला विविध आमिषे दाखवली. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पीडितेने या घटनेनंतर तात्काळ मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास स्वतः एसडीपीओ विनायक कोते करत आहेत. त्यांच्यासोबत मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि जिभाऊ तुकाराम पाटील हे तपासात सहकार्य करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *