Home » राष्ट्रीय » ‘भडक वक्तव्यांचा धंदा सुरू’; बजरंग सोनवणेंवर शहाजीबापूंचा हल्लाबोल

‘भडक वक्तव्यांचा धंदा सुरू’; बजरंग सोनवणेंवर शहाजीबापूंचा हल्लाबोल

सोलापूर : वृत्तसंस्था 

सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. फुकट प्रसिद्धीसाठी सध्या भडक बोलण्याचा उद्योग सुरू असून, अजित पवारांच्या अपघाताचे कुणीही राजकीय भांडवल करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करत, “विमानात बॉम्ब होता का?” असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच अजित पवार घराबाहेर पडल्यापासून विमानात बसेपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून ‘काय झाडी काय डोंगार’ फेम शहाजीबापू पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.

शनिवारी सांगोला तालुक्यातील चीक महूद येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अजित पवार यांचा विमान अपघात हा निव्वळ तांत्रिक स्वरूपाचा अपघात आहे. चूक नेमकी विमानात होती की वैमानिकाची, हे तपासातून समोर येईल. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले आणि जगातील उत्तम विमाने पाहिलेल्या शरद पवार यांनीही हा अपघात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विनाकारण संशय निर्माण करून अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत बोलताना शहाजीबापू पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात, विशेषतः सांगोला तालुक्यात महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे व शिवसेनेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे मागील ५५ वर्षांपासून सांगोला पंचायत समितीवर असलेली शेकापची सत्ता उलथवून महायुती विजयी होईल, असा दावा त्यांनी केला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *