Home » जळगाव » एक बिघा गांजाची लागवड उध्वस्त; ओला-सुका गांजा जप्त ; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई !

एक बिघा गांजाची लागवड उध्वस्त; ओला-सुका गांजा जप्त ; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई !

अमळनेर : प्रतिनिधी 

अमळनेर तालुक्यात मक्याच्या पिकाआड चक्क गांजाची शेती फुलवणाऱ्या एका शेतकऱ्याचा अमळनेर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. गडखाम्ब शिवारातील गट नंबर २३२४ मध्ये शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) पहाटे ६ वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी तब्बल एक बिघा क्षेत्रातील गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत ओला व सुका गांजा मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आला असून, सुरेश लोटन पाटील (रा. गडखाम्ब) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शेतकरी सुरेश पाटील याने आपल्या शेतात मका पेरलेला होता. मात्र, या मक्याच्या आड त्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गांजाची लागवड केली होती. सुमारे सहा फूट उंचीची गांजाची झाडे पूर्णतः वाढलेली असल्याचे आढळून आले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना या बेकायदेशीर लागवडीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन तसेच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत पहाटे ६ वाजता शेताला वेढा घालण्यात आला. शेताची पाहणी केली असता मक्याच्या आडोशाला गांजाची झुडपे मोठ्या प्रमाणात आढळून आली. यासोबतच ५ ते ७ गोण्यांमध्ये भरलेला ओला गांजा तसेच काही ठिकाणी वाळत घातलेला सुका गांजाही पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सुरेश पाटील याने चौकशीत काही दिवसांपूर्वी गांजाचा साठा विकल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामागे मोठे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पंचनामा करून सर्व गांजाची झाडे उपटण्याची व नष्ट करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय भगवान शिरसाठ, शरद काकळीज, नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे, सुनील तेली, विनोद सोनवणे, राहुल पाटील, उदय बोरसे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, संजय सोनवणे, श्यामल पारधी, निलेश पाटील व विनोद पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *