जळगाव : प्रतिनिधी
रस्त्याने जात असताना झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रतन वसंत गायकवाड (वय ५१, रा. दापोरा, ता. जळगाव) यांचा उपचार सुरू असताना दि. ७ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोरा येथील रहिवासी असलेले रतन गायकवाड हे दि. २ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वावडदा परिसरातून दुचाकीने जात असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूला मार बसला होता. त्यांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवून शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना दि. ७ रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ गणेश वंजारी करीत आहेत.


