छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
रविवारचा दिवस छत्रपती संभाजीनगरसाठी ‘ब्लॅक संडे’ ठरला. शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांनी दोन हसती-खेळती कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त केले. नारेगावच्या अजीज कॉलनीतील शहबाज कमरोद्दीन बागवान (३१) सकाळी सुमारे १०:३० वाजता मोपेडवरून कामावर निघाला होता. भरधाव ट्रकने त्याला पाठीमागून धडक दिली, ज्यामुळे शहबाज रस्त्यावर फेकला गेला आणि डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, त्यात ट्रकचे समोरील चाक शहबाजच्या अंगावरून जाताना दिसत आहे.

शहबाज जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री दुकानात फायनान्सचे काम करायचा. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि अवघ्या सहा महिन्याची मुलगी आहे. या घटनेमुळे नारेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
सातारा शहरातील महालक्ष्मी कॉलनीमध्ये रुद्र जितेंद्र पाटील (९) हा मुलगा घरासमोरील गल्लीत खेळत असताना मद्यधुंद जेसीबी चालकाने त्याला चिरडले. जेसीबीचे अवजड चाक रुद्रच्या छातीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले, सध्या त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तो अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेसीबी चालकाला संतप्त नागरिकांनी जागीच रोखले. बालकाची अवस्था पाहून नागरिकांचा संताप वाढला आणि त्यांनी चालकाला चोप दिला. नंतर सातारा पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. या दोन्ही घटनांमुळे शहरभर हळहळ आणि संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी वाहनचालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असे आवाहन केले आहे.


