मुंबई : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत त्यांनी पाठपुरावा केलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.

आज (दि. १० फेब्रुवारी) मुंबई येथे कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर झालेली ही पहिलीच कॅबिनेट बैठक विशेष महत्त्वाची ठरली. या बैठकीत बारामती येथे ७५ कोटी रुपयांचे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तसेच वालचंदनगर–रत्नापूर एमआयडीसीसाठी एक हजार एकर जमीन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयालाही मान्यता देण्यात आली.
याशिवाय, दिवंगत अजित पवार यांनी राज्यात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची सूचना केली होती. त्यांच्या या प्रस्तावानुसार आजच्या कॅबिनेट बैठकीत ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. हे सर्व निर्णय अजित पवार यांनी निधनाच्या काही दिवस आधी महसूल मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून मांडले होते. या निर्णयांमुळे संबंधित भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंदापूर परिसरातील एमआयडीसी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा केली. रत्नापूर एमआयडीसीसाठी एक हजार एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या विकासदृष्टीला श्रद्धांजली म्हणून हे निर्णय पाहिले जात असून, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



