मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकरी आत्महत्या ही गंभीर सामाजिक समस्या लक्षात घेऊन कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याची घोषणा कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे केली आहे. अशा प्रकारचे कृती दल स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर एकत्रित उपाययोजना राबविण्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे केवळ योजनांच्या चौकटीतून न पाहता प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचा विभागाचा उद्देश आहे.

या कृती दलाचे नेतृत्व विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी करणार असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे आणि सोनाली शिळकर यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या टास्क फोर्समध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या तज्ज्ञांनाही स्थान देण्यात आले आहे. ‘शिवार फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर अभ्यास करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या कृती दलाच्या कामात मानवी संवेदना आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड मिळणार आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्या तरी हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, आर्थिक ताणतणाव, सामाजिक दबाव आणि मानसिक अस्थैर्य यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत. या सर्व घटकांचा समग्र विचार करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधार देणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपत्तीपूर्व, आपत्तीच्या काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांना शेती, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा चतुःसूत्री दृष्टिकोनातून मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे, संकटांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणे आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवणे हा या कृती दलाचा मुख्य उद्देश आहे.
यापूर्वी ‘शिवार संसद’ आणि ‘शिवार हेल्पलाइन – ८९५५७७१११५’ या उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आले आहे. या अनुभवाच्या आधारे आता धोरणात्मक पातळीवर अधिक व्यापक काम करण्याची संधी मिळाल्याचे डॉ. विनायक हेगाणा यांनी सांगितले. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न केवळ नुकसानभरपाईपुरता मर्यादित न ठेवता, शेतकऱ्यांना आधीपासून सक्षम करणे, उत्पन्न वाढवणे आणि मानसिक स्थैर्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. तर टास्क फोर्सचे अध्यक्ष रफिक नाईकवाडी यांनी सांगितले की, बदलत्या परिस्थितीनुसार जुन्या अहवालांचा अभ्यास करून नवीन आणि प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाईल.


