जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील महसूल विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून तलाठीसह दोन जणांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष करण्यासाठी संगनमताने लाच स्वीकारल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची तक्रार होती. ही वाहतूक सुरळीत सुरू राहावी आणि कारवाई टाळावी यासाठी संबंधित मंडळाधिकारी व तलाठी यांनी एका वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीकडून लाचेची मागणी केल्याचे समोर आले. याबाबत संबंधित व्यक्तीने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी लाच स्वीकारण्याच्या वेळी कारवाई करत तलाठीसह दोघांना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, इतर संबंधितांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे, लाचेची नेमकी रक्कम तसेच कारवाईचे तपशील अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाहीत. पुढील तपास एसीबीकडून सुरू असून, या घटनेमुळे अवैध वाळू वाहतूक आणि महसूल यंत्रणेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


