जळगाव : प्रतिनिधी
अयोध्यानगरात घरासमोर दुचाकी लावून गेट उघडत असलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी ओढून नेली. पोत बेन्टेक्सची असल्यामुळे संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली नाही. हा प्रकार २४ नोव्हेंबर रोजी रात्री घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती अनिल इंगळे या रात्री घराजवळ आल्या. त्यांनी दुचाकी लावून गेट उघडत असताना मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील पोत ओढली आणि दोघेही क्षणात पसार झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. स्वाती इंगळे यांनी पोत बेन्टेक्सची असल्याने तक्रार देण्यास नकार दिला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही चोरटे त्यात स्पष्ट दिसून आले. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.



