जळगाव | प्रतिनिधी शहरातील अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहिमेला वेग देत महापालिका प्रशासनाने ‘भंगाळे गोल्ड’ या आस्थापनावर पुन्हा कारवाई करत ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापूर्वीही याच प्रकरणात दंड आकारण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणातील एकूण वसुली आता १ लाख २० हजार रुपयांवर पोहोचली आहे.
तक्रारीनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

शहरातील विविध भागांमध्ये परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या होर्डिंग्ज आणि एलईडी स्क्रीनबाबत तक्रारी वाढत होत्या. हॉटेल रूपाली परिसरातील अनधिकृत होर्डिंगप्रकरण विशेष चर्चेत आले होते. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेने या प्रकरणाची दखल घेत कारवाईला सुरुवात केली.
नियमभंगावर कठोर भूमिका कायम
महापालिकेने जाहिरात फलकांसाठी निश्चित नियमावली लागू केली असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहराचे सौंदर्य आणि वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन ही मोहीम राबवली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मनपाचा इशारा
अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. नियमांचे पालन न केल्यास दंडाची रक्कम वाढविण्याबरोबरच संबंधित होर्डिंग्ज तात्काळ हटविण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


