Home » महाराष्ट्र » एसटी प्रवासासाठी १ ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक; राज्यभरात ४ हजारांहून अधिक वितरण केंद्रे सुरू

एसटी प्रवासासाठी १ ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक; राज्यभरात ४ हजारांहून अधिक वितरण केंद्रे सुरू

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून या प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. एसटी प्रवासी सेवेमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला असून, आतापर्यंत सुमारे ५१ लाख नागरिकांनी नोंदणी पूर्ण केली आहे. त्यापैकी जवळपास २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांना लवकरात लवकर कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना हे कार्ड सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही केंद्रे कार्यरत आहेत.

या कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा जादा शुल्क आकारल्यास संबंधित केंद्रावर कठोर कारवाई केली जाईल. दोषी आढळलेल्या केंद्रांचा परवाना रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, ज्या महिला व ज्येष्ठ नागरिकांनी अद्याप स्मार्ट कार्ड घेतलेले नाही, त्यांनी भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी १ ऑगस्टपूर्वी नोंदणी करून स्मार्ट कार्ड कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *