जळगाव (पब्लिक लाईव्ह ) : राज्य शासनाच्या महसूल विभागाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नवीन आदेश जारी केले असून, जळगावचे नवे प्रांताधिकारी (उपविभागीय अधिकारी) म्हणून आयएएस अधिकारी योगेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या जागी योगेशकुमार मीना यांची नियुक्ती झाली आहे.
योगेशकुमार मीना हे 2024 बॅचचे आयएएस अधिकारी असून, जळगाव येथे नियुक्तीपूर्वी ते हिंगोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी (Super Numerary Assistant Collector) म्हणून कार्यरत होते. आता जळगाव उपविभागाचा महत्त्वाचा प्रशासकीय कारभार त्यांच्या हाती सोपवण्यात आला आहे.

महसूल प्रशासनासमोर अनेक आव्हाने
जळगाव उपविभागाच्या दृष्टीने प्रांताधिकारी हे महत्त्वाचे प्रशासकीय पद मानले जाते. महसूल प्रशासन, नागरिकांच्या तक्रारी, शासकीय योजनांची अंमलबजावणी, जमीनविषयक प्रकरणे तसेच विविध प्रशासकीय बाबींवर प्रांताधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते.
नवनियुक्त प्रांताधिकारी योगेशकुमार मीना यांच्यासमोर प्रलंबित महसूल प्रकरणांचा निपटारा, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही प्रमुख आव्हाने असणार आहेत.
विनय गोसावी यांच्या बदलीचे आदेश प्रतीक्षेत
जळगावचे प्रांताधिकारी म्हणून विनय गोसावी यांनी महसूल प्रशासनासह विविध महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या जागी आता आयएएस योगेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, विनय गोसावी यांची पुढील नियुक्ती कोणत्या पदावर किंवा विभागात होणार, याबाबतचे स्वतंत्र आदेश अद्याप प्रतीक्षेत आहेत.
नवनियुक्त प्रांताधिकारी योगेशकुमार मीना हे लवकरच जळगाव उपविभागाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव उपविभागाच्या महसूल प्रशासनाला नवा प्रशासकीय चेहरा मिळाला आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


