Home » जळगाव » पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा भव्य सोहळा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केली अभिषेक व आरती

पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा भव्य सोहळा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केली अभिषेक व आरती

जळगाव दि.५ प्रतिनिधी – अंगारकी चतुर्थीच्या पावन निमित्ताने पद्मालय गणपती मंदिरात पहाटेपासून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पहाटे ४ वाजता अभिषेक, विधिवत पूजा व आरती पार पडली. या धार्मिक सोहळ्यामुळे मंदिर परिसर मंगलमय झाला होता.

पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन व जागृत स्थान मानले जाते. विशेष म्हणजे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील अद्वितीय मंदिर आहे. संकष्टी व अंगारकी चतुर्थीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.

पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणावरून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सकाळी विधिवत पूजा केली. मंदिराचे पुजारी गणेश वैद्य व केशवराव पुराणिक यांनी मंत्रोच्चारात पूजा पार पाडली. पूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंदिराचा इतिहास व सुरू असलेल्या विकासकामांची माहिती घेतली. देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा शाल व गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे, राजेश तिवारी, अर्जुन पाटील, शिरीष बर्वे यांच्यासह तहसीलदार गोपाल पाटील, जैन इरिगेशनचे अनिल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. पूजेचे नियोजन देवस्थानचे सहकारी अशोक पाटील व जोशी यांनी केले.

उन्हाची तीव्रता लक्षात घेता भाविकांसाठी मंडप, कुलर व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पद्मालय येथे होणारा हा धार्मिक सोहळा भाविकांसाठी श्रद्धा व भक्तीचा केंद्रबिंदू ठरतो.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *