Home » जळगाव » पहाटेच्या प्रवासात भीषण दुर्घटना; दोन तरुण ठार, तिघांवर उपचार सुरू

पहाटेच्या प्रवासात भीषण दुर्घटना; दोन तरुण ठार, तिघांवर उपचार सुरू

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील विरवाडा येथून चोपडा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या चारचाकी वाहनाला अपघात होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास आडगाव–चोपडा दरम्यान घडली. या अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये राहुल अमृत भोई (वय ३१) व मयूर अरुण राजपूत (वय १९, दोघे रा. विरवाडा) यांचा समावेश आहे. तर विजय अमृत भोई (वय ३५), बंटी रवींद्र कोळी (वय १९) व राकेश भगवान राजपूत (वय ३५) हे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचही जण एमएच-१९ बीएस-१००८ क्रमांकाच्या इर्टिगा वाहनाने चोपडा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते. आडगाव–चोपडा मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. या भीषण अपघातात राहुल भोई व मयूर राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी विजय भोई यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले असून बंटी कोळी व राकेश राजपूत यांच्यावर चोपड्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच विरवाडा येथील सरपंच विशाल म्हाळके, माजी पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान, मयत मयूर राजपूत यांच्यावर दुपारी ३ वाजता तर राहुल भोई यांच्यावर सायंकाळी ४.३० वाजता विरवाडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा समावेश असून त्यापैकी राहुल भोई यांचा मृत्यू झाला, तर विजय भोई हे गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे विरवाडा गावावर शोककळा पसरली असून भोई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत व जखमी पाचही जण प्रवासी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांनी आपली वाहने भाड्याने दिली होती. अपघाताच्या आदल्या दिवशी ते विरवाडा येथे गेले होते आणि पहाटे पुन्हा चोपड्याकडे परत येताना ही दुर्घटना घडली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *