छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
धनंजय मुंडे यांच्या आमदारकीबाबत औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीत मोठी घडामोड होण्याची शक्यता असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. “धनंजय मुंडे यांची आमदारकी १०० टक्के रद्द होणार,” असा ठाम दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्च रोजी होणार असून, न्यायालयाने संबंधित सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

खंडपीठात सुनावणी पार पडल्यानंतर करुणा मुंडे यांनी सांगितले की, “आमच्या प्रकरणाची अर्धी सुनावणी पूर्ण झाली आहे. पुढील तारखेपासून मुख्य सुनावणीला सुरुवात होईल. उच्च न्यायालयाने आम्हाला सर्व पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. आम्ही आवश्यक कागदपत्रांसह न्यायालयात भक्कम बाजू मांडणार आहोत.”
धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध दोन वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये कायदेशीर लढा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परळीत अर्ज फेटाळल्यानंतर अंबाजोगाई न्यायालयात अपील दाखल करण्यात आले असून, तेथेही न्यायालयाने धनंजय मुंडे यांना नोटीस बजावल्याचे त्यांनी सांगितले. “दोन्ही ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल, याची मला खात्री आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परळीतील तहसीलदाराला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याच्या घटनेचा संदर्भ देत करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले. “२० हजार रुपयांसाठी तहसीलदार तुरुंगात जाऊ शकतो, तर माझा निवडणूक अर्ज अवैध ठरवण्यासाठी किती मोठी रक्कम दिली गेली असेल, हे न्यायालयाच्या प्रक्रियेतून स्पष्ट होईल,” असा दावा त्यांनी केला. मात्र या आरोपांबाबत संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
दरम्यान, धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदाची स्वप्ने पाहत असल्याची टीका करत करुणा मुंडे म्हणाल्या की, “आता त्यांची आमदारकीच रद्द होईल.” आमदारकी रद्द करण्यासाठी सर्व ताकदीने प्रयत्न सुरू असून कायदेशीर लढाईत विजय आमचाच होईल, असा दावा त्यांनी केला. या वक्तव्यांमुळे बीड जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, ६ मार्चच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


