Home » जळगाव » यावल-बोरावल मार्गावर भीषण अपघात; विद्यार्थ्यांनी भरलेली कार एसटीवर आदळली

यावल-बोरावल मार्गावर भीषण अपघात; विद्यार्थ्यांनी भरलेली कार एसटीवर आदळली

यावल : प्रतिनिधी

यावल-बोरावल-टाकरखेडा मार्गावरील भालशिव फाट्यावर शनिवारी सकाळी एसटी बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. यात चालकासह सुमारे १० ते १२ विद्यार्थी जखमी झाले. यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  यावल बसस्थानकावरून सकाळी सुमारे ७:३० वाजता बोरावल गावाकडे जाणारी एसटी बस (क्र. एमएच ४० एन ९८४५) नियमित फेरीवर निघाली होती. दरम्यान, भालशिव फाट्याजवळ विद्यार्थ्यांची ने-आण करणारी कार (क्र. एमएच ३७ जी ६६८०) समोरून येत असताना दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना व चालकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर काही विद्यार्थ्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली व अपघातग्रस्त वाहनांची तपासणी केली. अपघातातील कार पोलिसांनी जप्त केली असून पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी ग्रामीण रुग्णालय व पोलिस ठाण्यात भेट देऊन जखमींची विचारपूस केली तसेच संपूर्ण घटनेची माहिती घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाची चूक की रस्त्याची परिस्थिती याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *