जळगाव : पणन महासंघाचे उपाध्यक्ष तसेच जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४-२५’ प्रदान करून गौरविण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योजक, राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोहित निकम यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे ७ मार्च रोजी आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात रोहित निकम यांच्या वतीने त्यांचे बंधू व न्यू सॉफ्टएड कॉम्प्युटर चे संचालक रितेश निकम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमास निवृत्त न्यायमूर्ती वसंतराव पाटील, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहिर, शहीद मिलिंद खैरनार यांच्या पत्नी हर्षदा खैरनार, हेमंत धात्रक, संतोष मराठे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जगन्नाथ पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले.
रोहित निकम यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


