Home » जळगाव » जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अतिक्रमण कारवाईत होत असलेल्या कथित भेदभावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने जळगाव महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत प्रशासनाला जाब विचारला आहे.

खोटे नगर ते कालिका माता मंदिर या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, विशेषतः परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर विविध साहित्य विक्री सुरू असतानाही अतिक्रमण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

याउलट स्थानिक मराठी तरुण उपजीविकेसाठी छोटे-मोठे व्यवसाय करत असताना त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई केली जात असल्याने शहरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत दुहेरी निकष लावले जात आहेत का?” असा सवाल उपस्थित करत मनसेने प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेने हॉकर्स धोरणाबाबत सविस्तर भूमिका मांडत शहरात नियोजित व कायदेशीर फेरीवाला क्षेत्र (हॉकर्स झोन) तातडीने निश्चित करण्याची मागणी केली आहे. शहरातील लघु व्यावसायिकांना योग्य जागा, मूलभूत सुविधा आणि कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी फेरीवाला नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

स्थानिक मराठी तरुणांसाठी स्वतंत्र व सुसज्ज फेरीवाला क्षेत्र आखण्यात यावे, जेणेकरून त्यांना सन्मानाने व्यवसाय करता येईल, अशी ठाम मागणी करण्यात आली.

मनसेने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता आणि सर्वांवर समान निकष लागू झाले पाहिजेत, अन्यथा हा प्रश्न सुटणार नाही. तसेच स्थानिक मराठी फेरीवाल्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि त्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही देण्यात आली.

खोटे नगर ते कालिका माता मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमणांचे समान निकषांवर पुनरावलोकन करण्यात यावे, तसेच परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून होणारे बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी मनसेने केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच गरज पडल्यास अतिक्रमण हटविण्याची कारवाई जनतेच्या सहकार्याने स्वतः हाती घेण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित

मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, तसेच चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, बादशहा शहा, अल्ताफ शहा, महिला सेनेच्या अनिता कापुरे, भूषण ठाकूर, हेमंत मराठी, यश पाटील, गोपाल कोळी, शुभम काळे, चिराग लोखंडे, चुनेस अत्तरदे, सोनू निमाडकर, ऋषी पाटील, साई पाटील, गौरव पाटील, दर्शन पाटील, पंकज बोरसे, रोहित कोळी, आदित्य गायकवाड, राहुल सोनवणे, पियुष जहा, धीरज काळे, श्याम मराठे, माया मराठे तसेच अन्यायग्रस्त मराठी फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *