जळगाव | ११ मे २०२६ जळगाव शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू असलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना भारतात प्रवेश करून वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेत असून तिला आश्रय देणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार शहरात सुरू असलेल्या “विशेष शोध मोहिमे” अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला कोणतीही वैध कागदपत्रे नसताना राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिपेठ पोलिसांनी दि. १० मे २०२६ रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बांगलादेश) हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान संबंधित महिलेने कोणतेही वैध Visa किंवा Passport नसताना घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. तसेच ती जळगाव शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये बांगलादेशी महिला कोणीका राणी शामलचंद्र राय हिच्यासह चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) याचा समावेश आहे. संबंधित महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असूनही तिला पोलिसांपासून लपवून ठेवत आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
सदर प्रकरणात इमिग्रेशन आणि परदेशी कायदा २०२५ अंतर्गत कलम २१, ०८ आणि २४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी करत आहेत.
दरम्यान, जळगाव पोलिस दलाकडून शहर व जिल्ह्यात अवैध वास्तव्य, बनावट कागदपत्रे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील बाबींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिस प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




