Home » क्रिकेट » सागर पार्क मैदान क्रिकेटसाठी कायम खुले ठेवा; महासभेतील बंदीचा ठराव रद्द करण्याची मागणी

सागर पार्क मैदान क्रिकेटसाठी कायम खुले ठेवा; महासभेतील बंदीचा ठराव रद्द करण्याची मागणी

जळगाव : मनपाच्या मालकीच्या सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धांना बंदी घालण्याचा प्रस्ताव आगामी १४ मे रोजी होणाऱ्या मनपा महासभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरातील क्रिकेट प्रेमी, खेळाडू व विविध सामाजिक घटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर बंदीचा ठराव रद्द करून पूर्वीप्रमाणे अटी-शर्तींसह क्रिकेट स्पर्धांना परवानगी कायम ठेवावी, अशी मागणी माजी नगरसेवकांसह विविध पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील मनपा मालकीचे सागर पार्क हे एकमेव मोठे मैदान असून गेल्या दहा-बारा वर्षांपासून येथे विविध धर्म व समाज घटकांकडून डे-नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. नोव्हेंबर ते जानेवारी-फेब्रुवारी या थंडीच्या कालावधीत सायंकाळी व रात्रीच्या वेळेत मनपा व पोलिस प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सामने खेळवले जातात.

काही रहिवाशांकडून ध्वनीप्रदूषण व स्वच्छतेबाबत तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी ध्वनीक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवणे, स्पर्धेची वेळ रात्री १० ऐवजी ९ वाजेपर्यंत मर्यादित करणे, तसेच मैदान परिसराची नियमित स्वच्छता ठेवणे अशा अटी लागू करून स्पर्धा सुरू ठेवता येऊ शकतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, सागर पार्क मैदानाबाबत पूर्वीही व्यावसायिक वापरासाठी प्रयत्न झाल्याचा उल्लेख करत मैदान हळूहळू खेळांसाठी बंद करून अन्य हेतूंसाठी वापरण्याचा डाव असू शकतो, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.

क्रिकेट स्पर्धांमुळे विविध समाज, धर्म व जातींमध्ये सामाजिक एकोपा वाढत असून युवकांना खेळासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महासभेत क्रिकेट सामन्यांवरील बंदीचा प्रस्ताव रद्द करून पूर्वीप्रमाणे मैदान स्पर्धांसाठी खुले ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही मागणी माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनिल भैय्या माळी, राजुभाऊ मोरे, किरणभाऊ राजपूत, रिंकू चौधरी, सुहास चौधरी, नईम खाटीक आदींनी केली आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *