Home » जळगाव » जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा ‘ऑपरेशन कट्टा’; दोन कारवाईत पिस्तुलांसह तिघांना अटक

जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा ‘ऑपरेशन कट्टा’; दोन कारवाईत पिस्तुलांसह तिघांना अटक

पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेत धरणगाव आणि भुसावळ येथे दोन वेगवेगळ्या कारवाई मध्ये गावठी पिस्तुलांसह तिघांना अटक केली आहे. या कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रांचा वाढता वावर पुन्हा एकदा समोर आला असून पोलिसांनी अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत १४ मे रोजी सायंकाळी गिरणा नदी पात्र परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत आनंदा बळीराम सपकाळे (वय ३९, रा. सिद्धार्थ नगर, आव्हाणे ता. जळगाव) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिन जप्त करण्यात आले. आरोपीकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याने त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर यांच्या पथकाने केली.
दुसऱ्या घटनेत भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकून दोन आरोपींना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक केली. शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या मागील मोकळ्या जागेत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत असद अली शेख खालीद अली (वय १९, रा. आझाद नगर, बुऱ्हाणपूर, म.प्र.) आणि मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात अवैध शस्त्रांचा वाढता वापर चिंतेचा विषय ठरत असून पोलिसांकडून “ऑपरेशन कट्टा” अंतर्गत अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *