पब्लिक लाईव्ह न्यूज | (प्रतिनिधी )जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारात मंगळवारी मध्यरात्री वाळू माफियांविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. मात्र, तब्बल २५ ते ३० अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असतानाही वाळू माफियांनी प्रशासनालाच खुले आव्हान देत काही डंपर पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोरा व धानोरा शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक रात्री कारवाईसाठी दाखल झाले. कारवाई सुरू असताना काही डंपर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, याचवेळी वाळू माफियांनी गोंधळ घालत प्रशासनासमोरूनच काही डंपर घेऊन पलायन केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

घटनास्थळी मोठ्या संख्येने दापोरा गावातील नागरिकही जमा झाले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कारवाईदरम्यान वाळू माफियांच्या साथीदारांनी तलवार, कुऱ्हाड आणि चॉपर यांसारखी धारदार हत्यारे दाखवत गावकऱ्यांना धमकावले. काहींनी ग्रामस्थांवर धावून जात हल्ल्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित असताना वाळू माफियांना डंपर पळवून नेण्याचे धाडस कसे झाले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच अवैध रेती उत्खननाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर येणे अपेक्षित असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दापोरा ग्रामस्थांनी केली आहे. वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीविरोधात लवकरच आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
(टीप : वरील बातमीत नमूद आरोप हे स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेले असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)
Author: K P Chavan
thepubliclive


