Home » जळगाव » पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अनोखे आवाहन; हार-तुरे नको, विद्यार्थ्यांसाठी वह्या आणा!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अनोखे आवाहन; हार-तुरे नको, विद्यार्थ्यांसाठी वह्या आणा!

पाळधी | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री मा. गुलाबराव पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि नागरिकांनी हार, पुष्पगुच्छ अथवा महागड्या भेटवस्तू न आणता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य आणावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

समाजातील दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त जमा होणारे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असून त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

राजकीय जीवनात सामान्य कार्यकर्त्यापासून मंत्रीपदापर्यंतचा प्रवास करणारे गुलाबराव पाटील हे नेहमीच सामाजिक जाणीव जपत जनतेच्या प्रश्नांसाठी आग्रही राहिले आहेत. वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणालाही समाजकारणाची जोड देत त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.“एका विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी दिलेली मदत हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल. समाजातील प्रत्येकाने शिक्षणासाठी हातभार लावल्यास अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते,” अशी भावना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ५ जून रोजी सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत जी.पी.एस. शाळेचे मैदान, पाळधी येथे शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता गांधी चौक, पाळधी येथे जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे.

गुलाबराव पाटील यांच्या या अनोख्या आवाहनाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा हा उपक्रम असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. हार-तुरे आणि भेटवस्तूंऐवजी विद्यार्थ्यांच्या हातात वह्या-पुस्तके देण्याचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *