मुंबई | प्रतिनिधी सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि वंचित घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कहाणी मांडणारा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ अखेर १२ जून २०२६ रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
सामान्य नागरिकांना शासन दरबारी न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे आणि दुर्बल समाजघटकांच्या वेदना यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी आवाज उठवणारा हा भारतातील पहिला चित्रपट असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाचा प्रवास मात्र खडतर ठरला. विविध कारणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले असून, या काळात निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सेन्सॉर प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागल्याचे निर्मात्यांनी सांगितले. यामुळे आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत निर्माते संजीवकुमार राठोड, क्रिएटिव्ह दिग्दर्शक व सहनिर्माती शालिनी राठोड तसेच अभिनेते मंगेश देसाई उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजीवकुमार राठोड म्हणाले, “हा चित्रपट समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्हालाही मोठा संघर्ष करावा लागला. अनेक अडथळे आणि विलंबाचा सामना करून अखेर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आहोत. सत्य मांडण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.”
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे.
दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशयामुळे ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरणार असल्याची चर्चा आहे. अनेक अडचणींवर मात करत आता हा चित्रपट १२ जून रोजी राज्यभर प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडे संपूर्ण टीमचे लक्ष लागले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive



