जळगाव | प्रतिनिधी भविष्यातील कृषी क्षेत्रातील नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) अधिवेशनाचा जैन हिल्स येथे उत्साहात समारोप झाला. १ ते ८ जून दरम्यान तीन टप्प्यांत पार पडलेल्या या अधिवेशनात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील २०० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कृषी नवकल्पना आणि कृषी व्यवसाय नियोजनाच्या अभिनव संकल्पना सादर केल्या.
अधिवेशनात एकूण १६३ कृषी इनोव्हेशन आणि १६३ कृषी बिझनेस प्लॅन सादर करण्यात आले. तिसऱ्या सत्रातील कृषी इनोव्हेशन स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील सीताबाई पटवर्धन हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर कृषी बिझनेस प्लॅन स्पर्धेत जळगावच्या अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलने अव्वल स्थान मिळवले.

समारोप समारंभात जैन इरिगेशनचे अभिजित जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचन आणि चांगल्या व्यक्तींच्या सहवासाचे महत्त्व अधोरेखित केले. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी शार्बोनी पोद्दार यांची ओळख करून दिली.
अनुभूती स्कूलची दुहेरी कामगिरी
जळगावच्या अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलने या अधिवेशनात उल्लेखनीय यश संपादन केले. कृषी इनोव्हेशन विभागात शाळेच्या ‘नेक्सो बायोप्लग’ प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला, तर ‘कार्बोक्रेड – कार्बन क्रेडिट अँड सस्टेनेबल अॅग्रीकल्चर प्लॅटफॉर्म’ या कृषी बिझनेस प्लॅनला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला.
यावेळी फालीचे विद्यार्थी त्रिलोक चौधरी (देवास), श्रावणी अडसरे (नाशिक), प्रिया जरांगे (बीड) आणि सार्थक येवले (पुणे) यांनी उपक्रमातील अनुभव कथन केले. तसेच माजी विद्यार्थी प्रतिक्षा नांगरे आणि हर्षवर्धन खिल्लारे यांनीही मनोगत व्यक्त केले.
समारोप कार्यक्रमात गोदरेज अॅग्रोवेटचे विनोद चौधरी, यूपीएलचे अंकीत लढ्ढा, आयटीसीचे शुभेंदू दास, स्टार अॅग्रीचे दुर्गेश गोयल, एसबीआय फाउंडेशनचे मुक्तार आलम, रॅलीज इंडियाचे विभाकर, प्रॉम्प्टचे प्रकाश मकवाना आणि अमूलचे मिहीर पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपले अनुभव सांगितले.
फाली उपक्रमाला जैन इरिगेशनसह गोदरेज अॅग्रोवेट, यूपीएल, स्टार अॅग्री, रॅलीज इंडिया, ओमनिवोअर, प्रॉम्प्ट, एसबीआय फाउंडेशन, अमूल, उज्जीवन, रयत शिक्षण संस्था आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांचे सहकार्य लाभत आहे.
या अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील नव्या संधी, संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकतेचे व्यासपीठ मिळाले असून भविष्यातील कृषी नेतृत्व घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
Author: K P Chavan
thepubliclive


