मुक्ताईनगर | प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील लालमाटा, हलखेडा, मथपुरी, जोंधळखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये पहाटे विशेष धाडसत्र राबवत मोठी कारवाई केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस तपासात आरोपींकडून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, दुर्मिळ नाणी, सुवर्ण वस्तू व इतर कथित मौल्यवान वस्तूंच्या नावाखाली मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढले जात असल्याचे उघड झाले. देशभरातील लोकांना मुक्ताईनगर तालुक्यातील गावांमध्ये बोलावून बनावट वस्तू दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईत फरोज राजू पवार (वय ४०, रा. मथपुरी), रामजाने रायसिंग भोसले (वय ३२, रा. हलखेडा), आक्काबाई जोगिंदर भोसले (वय ३२, रा. हलखेडा), रोहित सुरेश पवार (वय ३२, रा. मथपुरी), राजकिरण जोगिंदर भोसले, दया जोगिंदर भोसले, शिवविकास जोगिंदर भोसले, जोगिंदर राजवंती भोसले (रा. हलखेडा), गांधी तिरसिंग भोसले, विलास नरसिंगलाल पवार आणि अजय दादा पवार यांच्याविरोधात विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून २० लाख रुपये रोख रक्कम, सुमारे ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ४ किलो चांदीचे दागिने (किंमत सुमारे ८ लाख रुपये), दोन देशी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, हरण, कोल्हा व सशाची कातडी, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी वाहने आणि ३० मोबाईल फोन जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ५८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या नोंदीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील या भागात मागील तीन वर्षांत १० दरोडे, १ खुनासह दरोडा, १ खून, ७ जबरी चोरी, १६ फसवणुकीचे गुन्हे, १ दरोड्याचा प्रयत्न आणि २ सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १९ जून २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ तथा मुक्ताईनगरचे प्रभारी केदार बारवोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), महेश गायकवाड (भुसावळ शहर), निलेश गायकवाड (भुसावळ तालुका), राहुल वाघ, आशीष लव्हांगळे (बोदवड), विशाल पाटील (सावदा), योगिता नारखेडे (नशिराबाद), मीरा देशमुख (निंभोरा) तसेच अमित कुमार बागुल (वरणगाव) यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
या विशेष मोहिमेत सुमारे २०० पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. जळगाव पोलिसांची ही कारवाई ‘ड्रॉप केस’ प्रकारातील फसवणूक, शस्त्र बाळगणे आणि वन्यजीव संरक्षण कायद्याच्या उल्लंघनाविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी व प्रभावी कारवाई मानली जात आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


