Home » महाराष्ट्र » जळगाव विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; नंदकिशोर महाजन 582 मतांनी विजयी

जळगाव विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; नंदकिशोर महाजन 582 मतांनी विजयी

जळगाव, दि. 22 जून : जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी दणदणीत विजय संपादन केला. आज पार पडलेल्या मतमोजणीत महाजन यांना तब्बल 582 प्रथम पसंतीची मते मिळाली असून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेत विधान परिषदेत प्रवेश निश्चित केला.

दि. 18 जून रोजी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. एकूण 630 मतदारांपैकी 616 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी 611 मते वैध ठरली तर 5 मते अवैध घोषित करण्यात आली. चाळीसगाव येथील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता.

मतमोजणीच्या अंतिम निकालानुसार नंदकिशोर महाजन यांना टेबल क्रमांक 1 वर 207, टेबल क्रमांक 2 वर 191 आणि टेबल क्रमांक 3 वर 184 अशी एकूण 582 मते मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार शरद तायडे यांना 17 मते मिळाली. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 मते तर अपक्ष उमेदवार रेश्मा काळे यांना 1 मत मिळाले.

एकूण वैध मतांपैकी सुमारे 95 टक्क्यांहून अधिक मते महाजन यांच्या पारड्यात पडल्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीची मजबूत पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली. ढोल-ताशांच्या गजरात विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, दीपक सुर्यवंशी, अरविंद देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, अर्चना मोरे तसेच प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या देखरेखीखाली मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *