पाळधी / जळगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याचा भव्य सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात भक्ती, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन घडले.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, समतेची आणि माणुसकीची जिवंत परंपरा आहे. विठ्ठलाच्या कृपेने गेल्या पाच वर्षांपासून हजारो वारकऱ्यांना पंढरपूर दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे.”

जी.एस. ग्राऊंडवरून दुपारपासूनच हजारो वारकरी एकत्र जमले होते. नोंदणीकृत भाविकांना ओळखपत्रे, प्रवास पास आणि आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यानंतर जी.एस. ग्राऊंडवरून नेहरू चौक मार्गे रेल्वे स्थानकापर्यंत निघालेल्या भव्य पालखी-दिंडीने संपूर्ण शहर भक्तिमय झाले. टाळ, मृदंग, वीणा, अभंग, हरिनामाचा गजर आणि भगव्या पताकांनी वातावरण विठ्ठलमय झाले होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वतः दिंडीत सहभागी होत टाळ वाजवत वारकऱ्यांसोबत अभंग म्हणाले. रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्यात जाऊन त्यांनी वारकऱ्यांची विचारपूस केली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधांची पाहणी करून रेल्वे सुटेपर्यंत ते स्थानकावर उपस्थित राहिले.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि GPS मित्रपरिवार यांनी केले. वारकऱ्यांसाठी डॉक्टरांचे पथक, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी, चहा-नाश्ता, भोजन, स्वयंसेवक, पंढरपूरमधील निवास, महाप्रसाद, दर्शन आणि परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष रेल्वेतील प्रत्येक डब्यात स्वयंसेवक आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोप्रेमी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर मनोज चौधरी तसेच विविध मान्यवर, वारकरी, टाळकरी, माळकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “विठू माऊली तू माऊली जगाची…” हे भक्तिगीत सादर केले. हजारो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या साथीने दिलेल्या प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर “विठ्ठल… विठ्ठल…” या अखंड नामगजराने दुमदुमून गेला. विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्र्यांनी वारकऱ्यांना पंढरपूर वारीसाठी शुभेच्छा देत निरोप दिला.
Author: K P Chavan
thepubliclive


