Home » जळगाव » जळगावात पल्स पोलिओ मोहिमेची उत्साहात सुरुवात; आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे उपस्थित

जळगावात पल्स पोलिओ मोहिमेची उत्साहात सुरुवात; आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे उपस्थित

जळगाव | प्रतिनिधी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागातर्फे रविवारी (२८ जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. धन्वंतरी देवतेचे पूजन करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार राजूमामा भोळे व महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ डोस पाजून अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी बाळ आणि बाळंत मातांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करत, आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, असे सांगितले.

महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन पालकांना केले. “पोलिओसारख्या गंभीर आजारापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला पोलिओ डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. ३० जूनपासून महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करणार असून, नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, आरोग्य विभागाचे उपसंचालक दिलीप सौंदळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, राष्ट्रीय हिवताप अभियानाचे अधिकारी के. बी. नगराळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, डॉ. राम रावलानी, डॉ. स्वप्नील सोनवणे, इन्चार्ज परिचारिका प्रिया सूर्यवंशी तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानांतर्गत शहरातील प्रत्येक शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकापर्यंत पोलिओचे दोन थेंब पोहोचविण्याचा महानगरपालिकेचा संकल्प असून, पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *