Home » जळगाव » साहेबांसाठी १० हजार, स्वतःसाठी ५ हजार; उताऱ्यासाठी लाच मागणारा भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात!

साहेबांसाठी १० हजार, स्वतःसाठी ५ हजार; उताऱ्यासाठी लाच मागणारा भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात!

जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरमापकाला वडिलोपार्जित घराचा उतारा अद्ययावत करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागातील लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

या प्रकरणातील संशयिताचे नाव जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) असे असून, त्याच्याविरुद्ध जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या कुटुंबाचे जळगाव शहरात वडिलोपार्जित घर असून, संबंधित मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याने त्यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अपील दाखल केले होते. सुनावणीनंतर तक्रारदाराच्या वडिलांचे नाव उताऱ्यावर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, २५ डिसेंबर २०२५ आणि ५ जून २०२६ रोजी अर्ज करूनही काम प्रलंबितच राहिले.

त्यानंतर १८ जून रोजी चौकशी केली असता, भूकरमापक जितेंद्र पाटील यांनी “साहेबांसाठी १० हजार रुपये” अशी मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत २५ जून रोजी एसीबीकडे लेखी तक्रार केली.

तक्रारीची पडताळणी करताना भूकरमापकाने “साहेबांसाठी १० हजार आणि स्वतःसाठी ५ हजार”, अशी एकूण १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताना जितेंद्र पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी केली. पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील, संगिता पवार, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि मनोज पाटील यांचा सहभाग होता.

दरम्यान, कोणत्याही सरकारी कार्यालयात कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *