जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी महापालिकेने १९ प्रभागांतील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांच्या कामांना ६ जुलै रोजी कार्यादेश दिला. मात्र कार्यादेशाला दोन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटूनही शहरातील एकाही प्रभागात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीच्या प्रश्नाकडे स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
महापौर दीपमाला काळे यांनी सर्व १९ प्रभागांना समान निधी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयुक्त आदित्य जिवने यांनी १.९० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली होती. प्रत्येक प्रभागासाठी सुमारे ९.९९ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून ही कामे सात कंत्राटदारांमध्ये विभागण्यात आली आहेत. मात्र मंजुरी आणि कार्यादेश मिळूनही प्रत्यक्ष कामांचा मागमूस नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, पावसामुळे शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असतानाही रस्ते दुरुस्तीची कामे सुरू न झाल्याने नागरिकांची नाराजी आणखी वाढली आहे.
महापालिका सूत्रांच्या माहितीनुसार, कार्यादेशानंतर संबंधित प्रभागांतील कामांना गती देण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी प्रशासन आणि कंत्राटदारांमध्ये समन्वय साधणे अपेक्षित आहे. मात्र अनेक प्रभागांत त्याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याचे चित्र आहे. सभागृहात रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरणारे काही नगरसेवक आता स्वतःच्या प्रभागातील मंजूर कामांच्या अंमलबजावणीत निष्क्रिय असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, मंजूर निधी असूनही कामे रखडण्यामागील नेमके कारण काय, जबाबदारी कोणाची आणि नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते नेमके कधी मिळणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


