Home » जळगाव » ब्रेकिंग : आरोग्यदूत शिवाजी पाटील यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; जखमी

ब्रेकिंग : आरोग्यदूत शिवाजी पाटील यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; जखमी

जळगाव | पब्लिक लाईव्ह : जळगाव शहरात आज सकाळी धक्कादायक अपघाताची घटना घडली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्यदूत तथा पेहलवान शिवाजी पाटील (शिवा) यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी पाटील यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ७ वाजता शिवाजी पाटील हे दुचाकीवरून व्यायामशाळेकडे जात होते. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-१९-एएन-३१४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक जोरदार असल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रॅक्टर जळगाव महानगरपालिकेचा असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेतील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, संबंधित ट्रॅक्टरचा चालक अल्पवयीन असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे पोलिस तपासात चालकाचे वय तसेच वाहन चालविण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाले का, हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार अद्याप या प्रकरणी पोलिसात अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही. जखमी शिवाजी पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *