जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा देणाऱ्या जळगाव शहरातील शिवतीर्थ चौकाच्या सौंदर्यात आता आणखी भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील दुभाजकावर शिवकालीन मावळ्यांची भव्य आणि आकर्षक शिल्पे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण चौकाला ऐतिहासिक, देखणे आणि भव्य स्वरूप प्राप्त झाले असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हे शिल्पसमूह विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
जी.एम. फाउंडेशनच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव उपक्रमाला सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनने संपूर्ण योगदान देत भक्कम साथ दिली आहे. सामाजिक बांधिलकी आणि शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून हे सुशोभीकरण करण्यात आले आहे. उद्योग आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळत आहे.

या सुशोभीकरणाचा शुभारंभ आज जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जिवणे, महापौर दीपमाळा काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, मान्यवर, सुप्रीम इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात शिवमय वातावरण
शुभारंभ सोहळ्याला शिवरायांच्या शौर्याला साजेसा उत्साह लाभला. सुगंध, शिवसूर्य, शौर्यवीर आणि शिव तांडव या ढोल पथकांनी दमदार ढोलवादनातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांना मानवंदना दिली. ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण शिवतीर्थ चौक दुमदुमून गेला आणि परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले.
मावळ्यांच्या शौर्याची जिवंत अनुभूती
शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जळगावकरांच्या अस्मितेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. या पुतळ्यासमोरील परिसरात उभारण्यात आलेल्या मावळ्यांच्या भव्य प्रतिकृतींमुळे चौकाला जणू शिवकालीन इतिहासाची जिवंत अनुभूती मिळत आहे. स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचे शौर्य आणि त्याग नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या सुशोभीकरणातून झाला आहे.
सुप्रीम इंडस्ट्रीजच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक
शहराच्या विकासासोबतच सांस्कृतिक ओळख, ऐतिहासिक वारसा आणि सार्वजनिक सौंदर्य जपण्यासाठी उद्योगसमूहांनी पुढाकार घ्यावा, याचे आदर्श उदाहरण सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनने या उपक्रमातून घालून दिले आहे. जी.एम. फाउंडेशनची संकल्पना आणि सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनचे संपूर्ण योगदान यामुळे शिवतीर्थ चौकाला नवी ओळख मिळाली आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणांच्या सुशोभीकरणाला इतिहास आणि संस्कृतीची जोड दिल्यास शहराच्या सौंदर्यात वेगळेच वैभव निर्माण होते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. शिवतीर्थ चौकातून दररोज ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मावळ्यांचे शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा या भव्य शिल्पांमधून अनुभवता येणार आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


