पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच जुन्नर तालुक्यातील खोडद येथे शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या आळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पिकअप जीपला भरधाव कारची समोरून धडक बसली. यामध्ये दोन्ही वाहनचालकांसह पालक, विद्यार्थी असे एकूण 19 जण जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. ओतूर हद्दीतील धोलवड फाट्यानजीक शुक्रवारी (दि. 7) सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात घडला.

सविस्तर वृत्त असे कि, पिकअप जीपचालक अरविंद बबनराव हांडे (वय 55, रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर), ईश्वरी मोहन बोकड (वय 8), यश पंडित घाडगे (वय 7), सार्थक प्रकाश साळवे (वय 8), ऋषी राजेंद्र भले (वय 8), कुणाल भगवान लोहकरे (वय 7), सर्वेश पोपट बोकड (वय 7), श्रेया भाविक धोत्रे (वय 8), शिवांश सुधीर सस्ते (वय 8), आदित्य संपत तळपे (वय 9), मीना भगवान लोकरे (वय 23), प्रकाश कचरू साळवे (वय 39), विठ्ठल रखमा गाडगे (वय 70), कल्पना भीमराव धोत्रे (वय 50, सर्व रा. आळू, ता. जुन्नर), सुधीर जगन सस्ते (वय 42, रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर), कारचालक हर्ष दिनेश शहा (वय 24), ऋग्वेद युवराज पुसदकर (वय 22), हिमांशू किशोर पांडे, सुरज संतोष मोरे (वय 26) आणि प्रतीक दुनगुले (सर्वजण रा. पुणे) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी याबाबत माहिती दिली. आळू शाळेतील विद्यार्थी हे पालकांसह खोडद येथील शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पिकअप जीपमधून (एमएच 14 जीयू 1566) निघाले होते.
जीप ओतूर बाजूकडून नारायणगावच्या दिशेने जात होती. याचवेळी धोलवड फाट्यानजीक नारायणगावहून ओतूरकडे येणार्या भरधाव कारची (एमएच 12 जीएफ 0860) जीपला समोरून धडक बसली. यामध्ये विद्यार्थ्यांसह पालक तसेच जीप व कारचालक आणि इतर असे 19 जण जखमी झाले. जखमींना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ओतूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.



