अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना उफाळून येत असतांना आता अहिल्यानगर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गेल्या शनिवारी २२ फेब्रुवारी तपोवन रस्ता परिसरातून अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगर परिसरात मारून त्याला जाळून टाकल्याची माहिती तपासात समोर आली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (१९, रा. ढवण वस्ती, तपोवन रोड, सावेडी) असे त्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, त्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी वैभवला जाळून टाकल्याची कबुली दिली आहे.

तपोवन रस्त्यावरील सलूनच्या दुकानाजवळून चारचाकी मोटारीतून आलेल्या चौघांनी वैभव नायकोडी याचे अपहरण करून पळवून नेले. त्यातील एकाचे नाव लपका (रा. बोल्हेगाव) असे होते. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबत सीमा शिवाजी नायकोडी (रा. ढवण वस्ती, सावेडी) यांनी २७ फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्याद दाखल होताच तोफखाना पोलिसांनी अपहरण करणाऱ्या चौघांना एमआयडीसी परिसरातून अटक केली. अनिकेत ऊर्फ लपका विजय सोमवंशी (२३, रा. एमआयडीसी, नवनागापूर, ता. जि. अहिल्यानगर), सुमीत बाळासाहेब थोरात (२४, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), महेश मारोतीराव पाटील (२६, रा. शिवाजीनगर, नवनागापूर, जि. अहिल्यानगर), नितीन ऊर्फ निशिकांत अशोक नन्नवरे (२५, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) अशी त्यांची नावे आहेत.
आरोपींना ३ दिवस पोलिस कोठडी चौघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी त्या चौघांकडे वैभव नायकोडी याच्याविषयी चौकशी केली असता त्याला आम्ही २३ फेब्रुवारी रोजी मारहाण करून एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगरात जाळून टाकले आहे, अशी माहिती शनिवारी रात्री पोलिसांसमोर दिली. अपहरणाच्या गुन्ह्यात वाढीव खुनाचे कलम लावण्यात येईल.



