जळगाव : प्रतिनिधी
शहरापासून जवळ असलेल्या जळगाव खुर्द गावानजीक रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला सुरू असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. मध्यरात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात अवजड वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (११ मार्च) सकाळी ७ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव खुर्द हे गाव जळगाव शहरापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या या भागात राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण तसेच रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याच पुलाच्या बाजूला नव्याने सर्व्हिस रोड तयार केला जात आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असून येथे काही परप्रांतीय मजूर काम करत होते. मंगळवारी मध्यरात्री तिन्ही मजूर (अंदाजे वय ३० ते ४० वर्षे) सर्व्हिस रोडवर बांधकामाचे साहित्य व पट्टी टाकून झोपले होते. पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना चिरडून पलायन केले. पहाटे ७ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्त सांडलेले होते आणि मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही. हा संपूर्ण रस्ता आणि पुलाचे काम एका खासगी ठेकेदाराने घेतले आहे. त्यामुळे या अपघातात त्याच्याच कोणत्या तरी वाहनाचा हात असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. नशिराबाद पोलिसांनी संबंधित बांधकाम कंपनीशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तसेच, जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात येत आहे.



