चोपडा : प्रतिनिधी
अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर सुरत ते बुऱ्हाणपूर खासगी प्रवासी बस अडावदहून यावलकडे जातांना लोणी शिवारातील मोहन नाल्याजवळ कंटेनरला धडकल्याने नऊ जण जखमी झाले. यात लहान मुले, वृद्ध, महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मध्य प्रदेश परिवहन मंडळाची मान्यता असलेली खासगी सुरत ते बऱ्हाणपूर बस (एमपी ६८ पी- २७०) ही १५ रोजी दुपारी ४ वाजता ही अडावद ते पंचकदरम्यान लोणी शिवारातील मोहन नाल्याच्या पुलाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात तसेच दुचाकीस्वाराला वाचवताना पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागाहून जबर धडकली. या अपघातात बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. यात नबाब रुबाब खाटीक (वय ५०, यावल), गोकुळ प्रताप पाटील (३८, चोपडा), निर्मला एकनाथ चौधरी (४५, धानोरा), उज्ज्वला नीलेश पाटील (३८, धानोरा), भावेश शरद भामरे (१२, मेहरगाव), राजाराम भागा चव्हाण (६५, धुळे), आशा प्रदीप भामरे (३५, मेहरगाव), रामचंद्र बळीराम सोनवणे (५०, हिंगोणा), मंगला शंकर डोळे (५०, धुळे) हे जखमी झाले आहेत.
या वेळी लोणीचे पोलीस पाटील नरेंद्र पाटील यांनी १०८ रुग्णवाहिका बोलावून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केले. तेथे आरोग्य सेविका भारती सोनवणे, भिकुबाई बोदडे, नीशा वळवी, मोनाली पाटील, शिपाई विलास पवार, युवा प्रशिक्षणार्थी निखिल सोनवणे यांनी सर्व जखमी रुग्णांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जळगावच्या जिल्हा शासकीय महाविद्यालय रुग्णालयात रवाना केले. घटनास्थळी अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार सुनील तायडे, फिरोज तडवी, अनिल पिसाळ, शेषराव तोरे, पाशा बानित्य गांधी धान क्षेत्र दोन्ही बाजुंना खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. तसेच अडावद व पंचकचे तरुण लक्ष्मण गुरव, धीरेंद्र पाटील, शैलेश पाटील, सौरव पाटील यांनी रस्त्यावर पडलेल्या वाहनाच्या काचांचा थर साफ केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. दरम्यान, या प्रवासी बसने दिलेली धडक इतकी जबर होती की, बसचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. सुदैवाने जीवीत हानी मात्र टळली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सरू होते



