जळगाव : प्रतिनिधी
मुलाच्या सासरवाडीतील लोकांसोबत पेंच अभयारण्यात गेलेले लिमये कुटुंबिय घरी येण्यासाठी निघाले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अल्पना लिमये यांनी त्यांच्या आईला फोन करुन घरी येण्यासाठी निघाले असल्याचे सांगितले, आणि अवघ्या अर्ध्या तासात लिमये यांची कार उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर आदळून अल्पना पराग लिमये (वय ५६, रा.रिंगरोड) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. १६ मार्च रोजी मुर्तीजापूरजवळ घडली.

शहरातील रिंगरोड परिसरात पराग लिमये हे वास्तव्यास असून ते व्यावसायीक आहेत. लिमये हे पत्नी अल्पना यांच्यासह त्यांचा मुलगा, सून, व्याही यांच्यासोबत पेंच अभयारण्य येथे गेले होते. तेथून परतत असताना दि. १६ मार्च रोजी ते जळगावला येण्यासाठी निघाले. यावेळी दुपारच्या सुमारास अल्पना लिमये यांनी त्यांच्या आईला फोन करुन आम्ही घरी येण्यासाठी निघालो असल्याचे सांगितले. याचवेळी मुर्तीजापूरजवळ आल्यानंतर लिमये यांची कार रस्त्यावरील झाडांना पाणी देण्यासाठी उभ्या असलेल्या टँकवर जावून आदळली. ही धडक इतकी जोरात होती की, या अपघातात अल्पना लिमये या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत.



