मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसपासून अनेक वादंग निर्माण होत असतांना आता एका स्टँड-अप कॉमेडीयनने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आक्षेपार्ह टीका केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, “स्टँड-अप कॉमेडी करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण वाटेल ते काहीही बोलू शकत नाहीत. महाराष्ट्रातील जनतेने देशद्रोही कोण आहे हे ठरवले आहे. त्यामुळे कुणाल कामरा याने माफी मागावी. हे सहन केले जाणार नाही. विनोद करण्याचा अधिकार आहे, पण जर हे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाणूनबुजून बदनाम करण्यासाठी केले जात असेल तर ते योग्य नाही”, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२४) माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा खार येथील स्टुडिओ शिंदेंच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री फोडला. याप्रकरणी शिवसेना युवासेनेचे (शिंदे गट) सरचिटणीस राहुल कानल यांच्यासह १९ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसरीकडे कॉमेडियन कुणाल कामराला अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. या प्रकारानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कुणाल कामराने राहुल गांधींनी दाखवलेले लाल कव्हरचे संविधान पुस्तक पोस्ट केले आहे. दोघांनीही संविधान वाचलेले नाही. संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, परंतु त्याला मर्यादा आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी आम्हाला मतदान केले आणि पाठिंबा दिला. जे देशद्रोही होते त्यांना जनतेने घरी पाठवले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जनादेशाचा आणि विचारसरणीचा अपमान करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली. विनोद निर्माण करता येतो, पण अपमानास्पद विधाने करणे स्वीकारता येत नाही. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर आणि विचारसरणीवर अतिक्रमण करता येत नाही. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून न्याय्य ठरू शकत नाही.” कुणाल कामराने शिंदेंची खिल्ली उडवल्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. सुपारी घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते. पण त्याच्या नावाखाली अयोग्य काही सहन करणार नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला तर पुढच्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाहीत. कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलतान दिला. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जात असेल तर ते वाईट आहे. २०२४ च्या निवडणुकीत जनतेने ठरवून दिले की कोण खुद्दार आणि कोण गद्दार आहे ते…हा जनतेपेक्षा मोठा आहे का? असा सवाल त्यांनी केला.



