मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन यांना सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांन पुढे म्हटलंय की, नरेंद्र मोदी एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून 2002 या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतर उदयाला आले. या दंगलीत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांची जगाला, देशाला ओळख झाली. भाजपकडून अल्पसंख्याकांना तिकीट देताना, मंत्रीपद देताना दुजाभाव केला जातो. त्यांची मुस्लीमविरोधी वक्तव्ये पाहिल्यानंतर ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’असा टोला त्यांनी लगावला आहे.
सपकाळांचे ट्विट काय?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. 2100 चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर 1500 रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन 10 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे आणि 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी वीजमाफी, पीक कर्जाच्या व्याजात सवलत, दुधाचे अनुदान देण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेवर तर सुमारे 45 हजार कोटींचा बोजा सरकारवर असल्याने कर्जमाफीसारखी सध्या तरी राज्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कर्जदारांनी 31 मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाचे परतफेड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी ट्विट केले आहे.



