जळगाव : प्रतिनिधी
धावत्या रेल्वेतून पडल्याने सुरेश सीताराम आदवासी (वय ३०, रा. सेल्हा, जि. पन्ना, मध्यप्रदेश) या परप्रांतीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. ६ एप्रिल रोजी शिरसोली ते जळगाव दरम्यान घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशात राहणारा सुरेश आदवासी हा तरुण नाशिक येथून कटणी येथे जात होता. त्या वेळी शिरसोली ते जळगाव डाऊन मार्गावर खंबा क्रमांक ४१५/२७ ते ४१५/२९ दरम्यान रेल्वे बोगीच्या दरवाजातून तो खाली पडला. या विषयी रामानंद नगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस नाईक अतुल चौधरी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. सुरुवातीला मयताची ओळख न पटल्याने अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र मयताजवळ असलेल्या मोबाईलमधील एका क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता तो त्याच्या नातेवाईकांचा निघाला. याविषयी त्यांना माहिती दिल्यानंतर मध्यरात्री नातेवाईक जळगावात पोहचले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



