मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु असतांना आता शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यानंतर आता रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हॉटेल रिट्रीटमध्ये झालेल्या आमदारांच्या सभेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, एका रात्रीत परिस्थिती अशी पालटली की शिंदेंना बाजूला ठेवून उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनले. याची अधिक माहिती घेतली तर गोगावले काय म्हणाले ते कळेल, असा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच कोणते पद घेतले नाही. त्यांनी ती सगळी पदे शिवसैनिकांना दिली. मात्र, आता परिस्थिती उलटी आहे. बाप मुख्यमंत्री बेटा कॅबिनेट मंत्री आणि नेता रामदास कदम आउट. त्यावेळी सगळा महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला. बाळासाहेब असते तर हे होऊ दिले नसते, असेही रामदास कदम म्हणाले.
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल, या उद्धव ठाकरेंच्या विधानावर रामदास कदमांनी प्रतिक्रिया दिली. मनसेचे सहा नगरसेवक फोडणे हे महाराष्ट्राच्या मनात होते का?” वरळी मतदारसंघात तुमच्या मुलाला मनसेने पाठींबा दिला, आणि राज ठाकरे यांच्या मुलाविरुद्ध तुम्ही दादरमध्ये उमेदवार देऊन त्याला पाडलेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली. दोगलेपणा पहायचा असेल तर उद्धव ठाकरेंकडे बघा. उद्धव ठाकरेंची इज्जत निघून चालली आहे. मनसेसोबत आल्यावर इज्जत वाचेल अस त्यांना वाटत असेल. त्यामुळे ते मनसेचा कुठलाही प्रस्ताव मान्य करतील असेही रामदास कदम म्हणाले.
मुंबईतील मराठी माणूस उध्दव ठाकरेंमुळे हद्दपार झाल्याचा आरोप देखील रामदास कदम यांनी केला आहे. महानगरपालिकेत 25 वर्षात सत्तेत असताना तुम्ही काय केले? असा सवाल देखील रामदास कदम यांनी केला. महानगर पालिका उद्धव ठाकरेंकडे कधीच येणार नाही, असेही रामदास कदम म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांवर देखील रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार परिपक्व राजकीय नेते आहेत. कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा याबाबत त्यांचा कोणी हात धरु शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमात ठेवण्यापेक्षा त्यांनी एक घाव दोन तुकडे केले. मातोश्रीवर या उलट सुरु आहे, असे रामदास कदम म्हणाले.



