जळगाव : प्रतिनिधी
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा बाजूला घेण्याचे सांगितल्याने एका रिक्षा चालकाने विरोध करीत त्याच्यासह काही जण साखळदंड घेऊन वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून आले. हा प्रकार २१ जून रोजी बेंडाळे चौकात घडला. या प्रकरणी रिक्षाचालक अरुण रामदास टिलोरे (६७, रा. समतानगर) याच्यासह पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी, गणेश नेटके, विशाल पाटील हे बेंडाळे चौकात वाहतूक नियंत्रण करीत होते. पथकाने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा व फळविक्रेत्यांच्या हातगाड्या रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगितले. तेथील अरुण टिलोरे या चालकाने रिक्षा (क्र. एमएच १९, सीडब्ल्यू ३४७१) बाजूला न करता वाद घालत अरेरावी केली.
रिक्षाचालक वाद घालत असताना तेथे दुचाकीवर (क्र. एचएच १९, बीएन ००७८) अल्ताफ अहमद नावाचा व्यक्ती आला व मी युनियनचा अध्यक्ष आहे, तुम्ही रिक्षावाल्यांना त्रास का देतात, असे विचारू लागला व धमकीही दिली. तेथे पुन्हा चार ते पाच जण आले व त्यातील एका जणांच्या हातात साखळदंड होता. दुचाकीस्वार अल्ताफ अहमद याने चिथावणी दिली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली व तेथे शनिपेठ पोलिस पोहोचले. पथकाने सर्व जणांना ताब्यात घेत रिक्षा व दुचाकीही पोलिस ठाण्यात नेली.
शनिपेठ पोलिस ठाण्यामध्ये दुचाकी नेल्यानंतर तिची तपासणी केली असता डिक्कीमध्ये कोयता सापडला. या प्रकरणी पोकॉ ज्ञानेश्वर कोळी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (६४), मुजम्मील अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३८) तिन्ही रा. बालाजीपेठ, रिक्षा चालक अरुण टिलोरे, आदील बेग शरीफ बेग (२७, रा. रामनगर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले. पुढील तपास पोउनि योगेश ढिकले करीत आहेत.



