नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा कट उधळून लावला. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये आज लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी ‘ऑपरेशन महादेव’ असे मोहिमेला नाव देण्यात आले. लष्कराच्या ‘चिनार कॉर्प्स’नेही सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केली. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना ठार मारले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात शोध मोहीम सुरू असल्याचे लष्कराने म्हटले आहे. याठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता होती. या संदर्भात, लष्कराने ‘ऑपरेशन महादेव’ सुरू केले. मारले गेलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्याशी संबंधित आहेत की नाही याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, “हे दहशतवादी लष्करशी संबंधित असू शकतात.” असे सांगण्यात येत आहेत.
लष्कराने महादेव टेकडीवर एक छावणी उभारली आहे, ज्याद्वारे या भागातील हालचालींवर लक्ष ठेवले जाते. दहशतवादी मुसाची हालचाल याठिकाणी खूप पूर्वी दिसली होती. म्हणूनच शोध मोहीम सुरू होती. या कारवाईत लष्करासोबत जम्मू-काश्मीर पोलिसही सहभागी होते. लष्कराने मारलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये ज्या ठिकाणी चकमक झाली ती जागा एका टेकडीवर आहे. त्याठिकाणी केवळ पायी जात येते. असे सांगण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी महादेव टेकडीच्या परिसरात तंबू उभारले होते आणि ते याच ठिकाणी राहत होते. सध्या लष्कर हे दहशतवादी कुठून आले आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.



