जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘लाडकी बहिण’ आणि ‘एक रुपयात पीक विमा’ या योजनांच्या अंमलबजावणीवरून त्यांनी सरकारवर विश्वासघाताचा आरोप केला आहे. त्यांनी सरकारवर लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना दिशाभूल केल्याचा ठपका ठेवला आहे.

एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मागील दोन अधिवेशनांमध्ये सरकारने कोणत्याही लाभार्थिनीला ‘लाडकी बहिण’ योजनेतून वगळले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं, असं त्यांनी नमूद केलं. मात्र प्रत्यक्षात 26 लाखांहून अधिक महिलांना या योजनेपासून वंचित करण्यात आलं असून, हे वागणं सावत्र बहिणीसारखं असल्याचा आरोप पवारांनी केला.
या योजनेच्या पारदर्शकतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. लाडकी बहिण योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणली गेली होती आणि योग्य पडताळणी न करता कार्यान्वित केल्याने राज्यातील 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे, असं ते म्हणाले.
पीक विमा योजनाही एका रुपयात देण्याचं आश्वासन देत सुरुवात करून, नंतर ती योजना बंद करण्यात आली. त्यावरून रोहित पवार म्हणाले की, “शेतकऱ्यांना ‘टोपी’ घालणं आणि महिलांना अटी-शर्तींच्या नावाखाली योजनेतून अपात्र ठरवणं – हे सरकार फसवणूक करणाऱ्याचं उत्तम उदाहरण आहे.”



