मुंबई : वृत्तसंस्था
कांदिवली पूर्व येथील आकुर्ली परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपनिबंधक बापू कटरे यांच्या 44 वर्षीय पत्नी रेणू कटरे यांनी शनिवारी (26 जुलै) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रेणू या पेशाने शिक्षिका होत्या. त्यांच्या आत्महत्येमागे सासरकडून हुंड्यासाठी सतत होणारा शारीरिक आणि मानसिक छळ कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप रेणू यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात बापू कटरे आणि त्यांच्या आई यमाबाई कटरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बापू कटरे यांना अटक करण्यात आली आहे.

रेणू कटरे या कांदिवलीतील लोखंडवाला परिसरातील सिल्व्हर ओक इमारतीत पती बापू कटरे यांच्यासोबत राहत होत्या. रेणू यांनी आपल्या भावाला अनेकदा सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले होते. त्यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार, बापू कटरे यांनी रेणू यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली. मी उच्चपदस्थ अधिकारी आहे, तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही, असे बोलून बापू कटरे यांनी रेणू यांचा मानसिक छळ केला.
तसेच, रेणू यांची सासू यमाबाई कटरे यांनी कमी हुंडा दिल्याचा टोमणा मारत त्यांच्यावर माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकला. रेणू यांच्या वडिलांनी लग्नानंतर त्यांना 8 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या. शिवाय, 2023 मध्ये 12 लाख रुपये आणि 2024 मध्ये 10 लाख रुपये सासरच्या मंडळींना दिले होते. तरीही रेणू यांचा मानसिक आणि शारीरिक छळ थांबला नाही. त्यांना काठीने मारहाण केल्याचा गंभीर आरोपही रेणू यांच्या भावाने केला आहे.
या सततच्या छळामुळे रेणू यांची मानसिक अवस्था ढासळली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी 27 जुलै रोजी कुटुंबीयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बापू कटरे यांनी ऐनवेळी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. यामुळे रेणू यांची मानसिक स्थिती आणखी बिघडली. 26 जुलै रोजी रेणू यांनी आपल्या भावाला फोन करून सांगितले की, बापू कटरे विनाकारण मारहाण आणि शिवीगाळ करत आहेत आणि बैठकीला येण्यासही नकार देत आहेत. “माझा हा त्रास कधीच थांबणार नाही,” असे म्हणत रेणू यांनी फोन ठेवला.
त्याच दिवशी त्यांनी आपल्या कौटुंबिक डॉक्टरांना फोन करून पतीच्या त्रासाबद्दल सांगितले. पतीने मला फसवले, तो मिटींग टाळत आहे, मी त्यांना नको आहे, असे रेणू यांनी डॉक्टरांना सांगितले आणि फोन कट केला. डॉक्टरांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण रेणू यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी बापू कटरे यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी रेणू यांनी स्वत:ला फ्लॅटमध्ये कोंडून घेतल्याचे सांगितले. रेणू यांचे पुण्याहून आलेले कुटुंबीय पोहोचले तेव्हा त्यांना रेणू यांनी आत्महत्या केल्याचे समजले.
रेणू यांचा भाऊ, वकील नितीन शेवाळ यांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर दावा केला आहे. त्यांच्या मते, रेणू यांना सततच्या छळामुळे टोकाचे पाऊल उचलावे लागले. त्यांनी बापू कटरे यांच्यावर अवैध मार्गाने 25-30 लाख रुपये कमावत असूनही माहेरहून पैसे आणण्यासाठी रेणू यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. रेणू यांच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळाचा आरोप केला असून, याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात बापू कटरे आणि यमाबाई कटरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



