मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सत्तासंघर्ष, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले खटले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून परतल्यानंतर लगेचच शिंदे यांनी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटातील काही मंत्री आणि आमदार सध्या विविध वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकलेले असताना, पक्षाच्या प्रतिमेच्या दृष्टीने भाजपकडून काही स्पष्ट सूचना शिंदे यांना दिल्या गेल्याचे बोलले जात आहे. बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना संबंधित खटल्याची येणारी सुनावणी, मंत्र्यांवरील आरोप, तसेच आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनाच्या अनुषंगाने शिंदे हे आपल्या गटातील खासदारांसोबत बैठक घेणार आहेत. बैठकीत अधिवेशनात मांडायच्या मुद्द्यांबाबत मार्गदर्शन केले जाणार असून, पक्षाच्या पुढील धोरणावरही चर्चा होणार आहे. त्याचबरोबर, शिंदे इतर राज्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधणार असल्याचे समजते.दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “शिंदे साहेब प्रत्येक अधिवेशनादरम्यान आपल्या खासदारांची बैठक घेतात. त्याच अनुषंगानेच त्यांचा हा दौरा असून, काही राज्य प्रमुखांशी देखील त्यांच्या भेटी होणार आहेत,” असे सामंत यांनी सांगितले.शिंदे यांच्या दौऱ्यामुळे गटात हालचालींना वेग आला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य राजकीय स्थितीचा विचार करून तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
उद्धव ठाकरे गटाची सरकारवर टीका
दुसरीकडे, वादग्रस्त मंत्र्यांवर सरकारने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने विरोधकांनी टीकेचा भडिमार सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्यावरील प्रकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार केवळ समज देण्याचे धोरण राबवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यात महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, महायुतीमधील घटक पक्ष निवडणुकीत एकत्र लढणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने शिंदे यांचा दिल्ली दौरा अधिकच महत्त्वाचा मानला जात आहे.



